लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करताना सर्वच विभागांना मनुष्यबळाच्या कमतरतेची मोठा वानवा जााणवत आहे. यातच जनतेची मूलभूत समस्या सोडवणारी महत्त्वाची संस्था असणाऱ्या महापालिकेत तब्बल ५२५३ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेत सध्या १५,४९३ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ १०,९०८ पदे भरलेली असून तब्बल ५२५३ पदे रिक्त आहेत.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामावरही परिणाम होत आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून नागरिकांच्या कामावर त्याचा परिणाम होतोय. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मनपाच्या कामावरही परिणाम होत आहे. तेव्हा ही पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
यासंदर्भात रिपब्लिकन आघाडीतर्फे पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांना निवेदन सादर करीत ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात संजय पाटील यांच्यासह दिनेश अंडरसहारे, आशिष मेश्राम, अमर सूर्यवंशी, मनोज मेश्राम आदींचा समावेश होता.