आॅनलाईन लोकमतनागपूर : निर्जन स्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव किंवा छेडखानी (ईव्ह टिजींग) हा सर्रासपणे चालणारा प्रकार. मात्र याला गंभीरतेने न घेता दुर्लक्ष करून तक्रार करण्यास महिला पुढे येत नव्हत्या. मात्र महिलांचा सन्मान दुखावला जात असून हाही एक अपराध आहे, याबाबत गेल्या काही वर्षात जागृती वाढली आहे. दामिनी पथक आणि पोलिसांच्या एकूणच प्रयत्नामुळे विश्वास वाढत असून तक्रार करण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. २०१६ मध्ये २५८६ च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ पर्यंत ईव्ह टिजींगच्या ५०९७ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती नागपूर पोलीस विभागाने दिली आहे.निर्जन स्थळे, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, उद्याने, मॉल, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे या घटना होत होत्या. मात्र तक्रार करण्यास महिला किंवा मुली धजावत नव्हत्या. पोलीस विभागाने दामिनी पथके तयार करून ईव्ह टिजींगला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली. ३३९६६ ठिकाणी पेट्रोलिंग, सापळा कारवाई यामधून महिलांची मदत केली आहे. यामुळे सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे निदर्शनात येत आहे. दुसरीकडे विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१५ मध्ये विनयभंगाचे ४०७ गुन्हे व २०१६ मध्ये ३७६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१७ मध्ये विनयभंगाचे ३६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ८७ मायनर व २७३ गंभीर स्वरुपाचे होते. यातील ३४६ गुन्ह्यांचा तपास करून ३६० आरोपींना अटक करण्यात आली. यातील धक्कादायक प्रकार म्हणजे आरोपींमध्ये २२६ ओळखीचे, ७० शेजारी व ९ नातेवाईकांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यात घट नोंदविण्यात आली आहे. यावर्षी बलात्काराचे १४८ गुन्हे नोंदविण्यात आले व पोलिसांनी १४७ चा तपास केला. यापैकी लग्नाचे आमिष दाखवून केलेले ५६, प्रेमसंबंध व लग्नास नकार देणारे १५ व उर्वरित ६० गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील गुन्हेगार अनोळखी असणारा केवळ एक गुन्हा तर इतर गुन्ह्यातील आरोपींमध्ये शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांचा समावेश आहे.