लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात राहून आपण दैनंदिन कामे कशी करायची, असा अनेकांचा सवाल असतो. व्यायाम, चालणे किंवा रनिंग करण्यासाठी बाहेर पडावेच लागते, असेही बहाणे केले जातात. ही छोटीशी बेपर्वाई मोठ्या धोक्याला आमंत्रण देऊ शकते. मात्र घरी राहून कोणतीही गोष्टी करणे शक्य आहे. केवळ व्यायाम नाही तर रनिंगसुद्धा. ही गोष्ट पटवून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय मॅरेथान धावक अतुलकुमार चौकसे यांनी इमारतीच्या टेरेसवर ५१ किमीची ‘गो कारोना गो’ दौड यशस्वीपणे पूर्ण केली. टेरेसवर हजारो परिक्रमा करून ७ तास ४५ मिनिटात ही रन पूर्ण करीत लोकांना घरात राहून फिटनेस सांभाळण्याचा संदेश दिला. कोरोनाविरुद्धची लढाई घरात राहून आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळूनच जिंक ता येऊ शकते.शासन-प्रशासनातर्फे हीच गोष्ट वारंवार सांगितली जात आहे. त्यासाठीच लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र अजूनही काही लोक याचे गांभीर्य लक्षात घेताना दिसत नाही. संचारबंदीत थोडी शिथीलता असल्याने त्याचा फायदा घेत काहीना काही बहाणे करून विनाकारण बाहेर निघताना दिसतात. कुणी काही खरेदीसाठी तर कुणी व्यायाम व धावण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडतात. ही गोष्ट अतुलकुमार यांनाही पटणारी नव्हती. ते चंदननगरच्या महेश कॉलनी येथे भाड्याने फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी सांगितले, घरासमोर दोन उद्याने आहेत व सकाळी अनेक लोक व्यायाम व चालण्यासाठी येथे येतात. व्यायामासाठी उद्यानातील साहित्याचा वापर करतात. अजाणतेमुळे या साहित्यातूनही कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. त्यापेक्षा घरी राहूनच आपण व्यायाम करू शकतो, चालू, धावू शकतो आणि सुरक्षितही राहू शकतो. हा संदेश देण्यासाठी त्यांनी इमारतीच्या टेरेसवर ‘गो कोरोना गो’ ही रन आयोजित केली व यशस्वीपणे पूर्णही केली.
७ तास ४५ मिनिटात रन पूर्णअतुलकुमार यांनी साधारणत: सकाळी ६.३० वाजता आपल्या रनिंगला सुरुवात केली. यादरम्यान धावतानाच स्वत:च्या रूममध्ये येऊन पाणी, ज्यूस आणि आवश्यक नाश्ता करून घेतला. त्यांची पत्नी निकिता यांनी या सर्व गोष्टींची व्यवस्था पाहिली. योग्य वेळ व गती मोजण्यासाठी जवळ असलेल्या सॅटेलाईट कनेक्ट जीपीएस घडीचा उपयोग केला. तीन फ्लॅटच्या जागेएवढा इमारतीचा टेरेस आहे. यावर त्यांनी हजारो परिक्रमा केल्या. साधारणत: ८ ते १० मिनिटात एक किमीचा टप्पा घेत जवळपास दुपारी २.१५ वाजता ७ तास ४५ मिनिटात निर्धारित ५१ किलोमीटरची रन यशस्वीपणे पूर्ण केली.लोक लॉकडाऊन आणि सरकारने केलेले नियम पाळत नाहीत, हे दुर्दैवी आहे. बाहेर गेल्यावर कोणत्या वस्तूला हात लावल्याने, कुणाशी बोलल्याने आपल्या शरीरात कोरोना विषाणूचे संक्रमण होईल, हे सांगता येत नाही. घरात राहूनच आपण सुरक्षित राहू शकतो, हे समजून घेतले पाहिजे. घरी राहूनही रनिंग, स्ट्रेचिंग, व्यायाम आणि योगही केला जाऊ शकतो. हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.- अतुलकुमार चौकसे, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावक