नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तामिळनाडूतील एका टोळीने सलून व्यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी तामिळनाडूतील वेल्लोर येथील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एम. विजय कुमार (४६), अन्नू सॅम्युअल (४१) आणि जेकब थॉमस (५४) अशी आरोपींची नावे आहेत.
झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असलेले ओमप्रकाश वंदेवार हे सलून व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या मुलीने २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा दिली होती. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे वंदेवार चिंतेत होते. वंदेवार हे धार्मिक स्थळी जाऊन प्रार्थना करायचे. येथे त्यांनी मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याचे परिचितांना सांगितले. दरम्यान, लोकांनी त्याला वेल्लोरचे रहिवासी अन्नू सॅम्युअल हा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. वंदेवार यांनी सॅम्युअलशी संपर्क साधला.
सॅम्युअल आणि त्याच्या साथीदारांनी वंदेवार यांना ८० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देणे शक्य नसल्याने वंदेवार यांनी मुलीला पुन्हा नीट परीक्षेची तयारी करण्यास सांगितले. २०२२ मध्ये मुलीला परत कमी गुण मिळाले. त्यामुळे वंदेवार यांनी आरोपींशी संपर्क साधला. तामिळनाडूतील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी ५० लाखांची मागणी केली. त्यांच्या सांगण्यावरून वंदेवार वेल्लोरला पोहोचले. तिथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये आरोपी भेटले. आरोपींनी नोंदणीच्या नावावर एक लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ५१ लाख रुपये घेतले. तसेच वंदेवार यांना पैशाची बनावट स्लीप दिली. ५२ लाख मिळूनही आरोपींनी पैशांची मागणी सुरू केली. वंदेवार यांनी वेल्लोर येथील महाविद्यालय गाठून चौकशी केली असता फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आल्याचे समोर आले. वंदेवार यांनी नागपूर गाठून मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशाप्रकारे वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीची इतर प्रकरणेही समोर आली आहेत.
.. ... ... .. ... .. ... .. ... .. ... ..