लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड -१९ महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ५२ अनाथ बालकांना शासनाकडून ५ लक्ष रुपयाची मुदतठेव मंजूर करण्यात आली असून येत्या २३ ऑक्टोबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्र संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा कृतिदलाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, माविमचे सहायक जिल्हा समन्वयक व्ही. एम. झाडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, महापालिकेचे डी. एम. उमरेडकर, सी. एम. बोंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार, तसेच जिल्हा कृतिदलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
कोविड -१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिली जाते. त्यातून त्या अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडली जाते. या महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत आढावा घेऊन जिल्हाधिकारी म्हणाल्या की, जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७१ आहे. त्यापैकी ६९ बालकांचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि संबंधित लाभार्थी यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून ४८ बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे.