मोरेश्वर मानापुरे, नागपूर: महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), नागपूरच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत १.०४ कोटी रुपये किमतीचा ५२० रुपये किलो गांजा जप्त केला. यामुळे गांजा तस्कारी करणाऱ्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नागपूरजवळील बोरखेडी टोल येथे एक ट्रक रोखला. ट्रकचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ड्रायव्हरच्या केबिन आणि ट्रकच्या मालवाहू भागामध्ये विशेषत: अंगभूत पोकळी दिसून आली. या पोकळीत ५२० किलो गांजा लपवून ठेवला होता. या गांजाची किंमत १.०४ कोटी रुपये आहे. गांजा २४२ पॅकेटमध्ये पॅक केला होता.
या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले असून त्यांना एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. गांजा कुठून आणला आणि कुणाला देण्यात येणार होता, याची अधिकारी बारकाईने चौकशी करीत आहेत. याआधीही नागपूर डीआरआयने गांजा तस्कारीच्या अशा घटना उजेडात आणल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.