दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांऐवजी नियमित रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. नियमित रेल्वेगाड्यात प्रवाशांना विशेष रेल्वेगाड्यांऐवजी कमी प्रवासभाडे आकारण्यात येत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद नियमित रेल्वेगाड्यांना वाढला आहे. जवळपास सर्वच रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या अलीकडच्या काळात वाढत आहे.
नागपूर शहरात एका दिवसाला ८५० च्यावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रसारमाध्यमांवरील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. गेल्या नऊ दिवसात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ५२ हजार ७०३ प्रवाशांनी आपली प्रवासाची तिकिटे रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या प्रवाशांना ३ कोटी १८ लाख ३९ हजार ४६ रुपये परत करावे लागले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होईपर्यंत प्रवासी अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.