थर्टीफर्स्ट पोलीस ठाण्याच्या आवारात : ठाण्याबाहेर नातेवाईकांची गर्दी नागपूर : थर्टी फर्स्टच्या नावाआड वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ७१२ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. यात ५२७ तळीरामांचाही समावेश आहे. मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले होते. हुल्लडबाजी करणाऱ्यांना आणि दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी काळजी घेतली. मात्र, थर्टी फर्स्टच्या नावाखाली काहींनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस दुपारपासूनच अशा वाहनचालकावर कारवाईसाठी सरसावले. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या ५२७ वाहन चालकांवर, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या ४९ वाहनचालकांवर, सिग्नल तोडणाऱ्या ३९ जणांवर, सीट बेल्ट न बांधता वाहन चालविणऱ्या २६ जणांवर, ११ ट्रिपलसीट दुचाकी चालविणाऱ्यांवर आणि हेल्मेट न घालता वाहन चालविणाऱ्या ११ जणांवर तसेच अन्य ४९ अशा एकूण ७१२ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी रात्रीपासून कारवाईचा सपाटा लावल्यामुळे अनेक तळीरामांचा थर्टीफर्स्ट पोलीस ठाण्याच्या आवारातच झाला. तर, त्यांना घरी नेण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांची गर्दी जमल्याचेही चित्र होते. (प्रतिनिधी) प्रारंभी फूल, नंतर हूल ! वाहतूक नियमांचे पालन करून वाहनचालकांनी नववर्षाचे चांगल्या प्रकारे स्वागत करावे म्हणून वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनचालकांना शनिवारी दुपारी गुलाबाचे फूल दिले. याचवेळी दारूच्या नशेत वाहन चालविले तर कारवाई केली जाईल, असा सूचनावजा इशाराही दिला जात होता. मात्र, त्याला दाद न देता दारू पिऊन वाहनचालविणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येताच पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला. अनेक ठिकाणी पोलीस दुचाकीचालकाकडे लक्ष नसल्यासारखे उभे राहायचे. नंतर अचानक पुढे येऊन तळीरामांवर कारवाई करायचे. पोलिसांचा फुल देण्याचा कार्यक्रम दुपारपर्यंत तर हूल देण्याचा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत सुरू होता.
५२७ तळीरामांवर कारवाई
By admin | Published: January 02, 2017 2:04 AM