नागपूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यंदाही १०० टक्के निधी वितरित होणार आहे. जिल्ह्याला १६५.०९ कोटी निधी वितरित करण्यात आला असून, ९५.६२ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६८.७९ कोटी निधी वितरित व १४.८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यापैकी कोविडकरिता ६८.९४ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, ५३.९१ कोटी निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बचत भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीच्या बैठकीत दिली.
जिल्ह्यातील शाळा, पोलीस स्टेशन आदी सौर ऊर्जेवर आणा. तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांचे २०२१-२२ या वर्षासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव कालमर्यादेत नियोजन कार्यालयाकडे सादर करा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी दिले. यावेळी आ. राजू पारवे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थित होते.