लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बांधकाम मार्च २०१८ रोजी पूर्ण झाले. परंतु आयसीयूसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या निधीला मंजुरीच मिळाली नसल्याने ते रखडले होते. अखेर शासनाने गुरुवारी ५४ कोटी ३८ लाख ९८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याने लवकरच हा विभाग गंभीर रुग्णांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ औषध वैद्यकशास्त्र विभागाचे आयसीयू आहे. याच आयसीयूमध्ये इतरही विभागाचे गंभीर रुग्णही ठेवले जातात. यामुळे हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या निधीतून शल्यचिकित्सा विभाग, औषधवैद्यकशास्त्रविभाग व बालरोग विभागासाठी स्वतंत्र ‘आयसीयू’ बांधकाम पूर्ण केले. या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.प्रत्येक आयसीयूमध्ये १५ व्हेन्टिलेटर‘सर्जिकल इन्टेन्सीव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेसीव्ह केअर युनिट’ आणि ‘पेडियाट्रिक इन्टेन्सीव्ह केअर युनिट’मध्ये प्रत्येकी २० प्रमाणे ६० खाटा असतील. प्रत्येक ‘आयसीयू’मध्ये १५ ‘व्हेन्टिलेटर’, शिवाय मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा बसविण्यात येणार आहे. मेडिसीन युनिटमध्ये डायलिसीस उपकरणासह, एक कोटींचे मोबाईल डिजिटल रेडिओग्राफी सिस्टीम, ९० लाखांचे अल्ट्रासाऊंड सिस्टीम असणार आहे. सर्जिकल युनिटमध्ये १ कोटी २० लाखांचे मोबाईल एक्स-रे मशीन, ९० लाखांचे अल्ट्रासाऊंड तर दोन कोटी रुपयांचे हायपो हायपर थरमीया मशीन असणार आहे. पेडियाट्रिक युनिटमध्येही ९० लाखांच्या अल्ट्रासाऊंड मशीनसोबतच, मोबाईल एक्स-रेसह अनेक अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी केली जाणार आहे.