लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा-मोदी काळात देशावरील कर्ज वित्त मंत्रालयानुसार ८२ लाख कोटी (२०१८ साली) झाले असून एकूण कर्जात ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयावर सरासरी ५४ हजार रुपयाचे कर्ज झाले असून देशातील नागरिकांची ही सरकारी शोषण पद्धती नव्हे का? हाच देशाचा विकास का, असा प्रश्न बीआरएसपीचे नेते व विदर्भ निर्माण महामंचचे नागपूरचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेद्वारा सरकारला विचारला आहे.उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपण सरकारला रोज पाच प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते रोज सरकारला प्रश्न विचारत आहेत. बुधवारी पत्रपरिषद घेऊन त्यांनी उपरोक्त प्रश्न उपस्थित करीत सरकारला जाब विचारला. यासोबतच भाजपा-मोदी सरकारने वन नेशन वन टॅक्स ही घोषणा केली. २८ टक्के जीएसटी लावली. देशवासीयांवर विविध कर लावले. जीएसटीमधून पेट्रोल, डिझेल वगळून तेल कंपन्यांना फायदा पोहोचवला आणि सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले नाही का?, भाजपा सरकारने महागाई वाढवणारेच धोरण स्वीकारून देशातील नागरिकांना महागाईच्या खाईत लोटले नाही का, असे प्रश्नही त्यांनी यावेळी सरकारला विचारले.