जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच्या चिंतेचे कारण म्हणून पुढे येत आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून नागपूर तुरुंगातून आतापर्यंत ५४३ गुन्हेगार सोडण्यात आले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने राज्यांमधील तुरुंगातील कैद्यांना सोडण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने विचाराधीन व शिक्षा झालेल्या दोन्ही श्रेणीतील कैद्यांना मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने बहुतांश तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने आणि कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता सोडण्याचा आदेश दिला होता. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दिशेने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून २८ मार्चपासून ते आजतागायत २२२ कैद्यांची आकस्मिक अवकाश म्हणून मुक्तता करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे मोठ्या संख्येने गुन्हेगार जामिनाकरिता न्यायालयात हजर होत आहेत. आतापर्यंत १५४ गुन्हेगारांना अंतरिम आणि १६७ गुन्हेगारांना नियमित जामिनावर सोडण्यात आले आहे. अशा तºहेने नागपूर तुरुंगातून कोरोना काळात ५४३ कैदी मुक्त झाले आहेत.हे सोडण्यात आलेल्या आरोपींमध्ये वर्तमानातील गंभीर प्रकरणांचीही नोंद घेणे अनिवार्य ठरते. याच प्रकरणांतील काही गुन्हेगारांनी तुरुंगातून बाहेर पडताच खुनासारखे गंभीर कृत्यही केले आहे. नंदनवनमध्ये क्राईम ब्रँच हवालदाराची पत्नी व सक्करदरा येथील बॅग विक्रेत्याचा खून, अशाच गुन्हेगारांनी केला होता. नंदनवन येथील गुन्हेगाराने आधीही एका युवकाचा खून केला होता. त्याच्यावर सध्या चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्याची पार्श्वभूमी बघितली असती तर तो तुरुंगाच्या बाहेर आला नसता. विशेष म्हणजे, सोडण्यात आलेल्या कैद्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे कामही पोलीसच करत आहेत. यासाठी विशेषत्वाने बंदोबस्त ठेवण्यात येतो. कुख्यात गुन्हेगारांनाही इतक्या सहजतेने मुक्त करण्यात येत असल्याने, पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत. यात अनेक सरावलेले घरफोडी करणारे व लुटपाट माजवणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अतोनात परिश्रम घ्यावे लागले होते. त्यांना शिक्षा मिळावी म्हणूनही बराच जोर लावावा लागला होता. आता तेच गुन्हेगार बाहेर पडले आहेत आणि पुन्हा गुन्हा करण्याच्या शोधात आहेत. शहर पोलीस आधीच कोरोनाचा प्रकोपात संघर्ष करत आहेत आणि त्यात तुरुंगातून सुटलेल्या या आरोपींनी चिंता वाढवलेली आहे.भयंकर गुन्हेगार रांगेत आहेतच!तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने खून व अन्य गंभीर प्रकरणातील आरोपींची आपात्कालिन पॅरोलवर मुक्तता करण्याचा विचार केला आहे. त्याअनुषंगाने आणखी ६०० गुन्हेगार तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता आहे. यात अनेक गुन्हेगारांची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. हे गुन्हेगार बाहेर पडणे म्हणजे पोलिसांवरील ताण आणखी वाढणार आहे.