नागपूर: विजयादशमीनिमित्त कस्तुरचंद पार्कवर ५५ फूटांच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे, अशी माहिती सनातन धर्म युवक सभेचे अध्यक्ष प्राणनाथ साहनी, संजीव कपूर आणि मिलन साहनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कस्तुरचंद पार्कवर मंगळवारी २४ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता आयोजित रावणदहन कार्यक्रमासाठी रावणाचा ५५ फूट, कुंभकर्णाचा ५० फूट आणि मेघनाथचा ४५ फुटांचा भव्य पुतळा तयार करण्यात आला आहे. पुतळ्यांची पूजा केल्यानंतर रावणदहन करण्यात येईल. योळी सांस्कृतिक कार्यक्रमात रास गरबा, ढोल पथक, उत्तर रामायणातील लाईट ॲंड शो वर आधारित प्रभु श्रीराम नाटिका होईल.
विश्व ममत्व फाऊंडेशनच्या वतीने तृतीय पंथीयांच्या ग्रुपतर्फे कण कण मे रामचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला नरेंद्र सतीजा, योगराज साहनी, विजय खेर, गोपाल साहनी, विनय ओबेरॉय, निर्मल दुदानी आणि सनातन धर्म युवक सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.