नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व नॅशनल वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग प्रोग्राम यांनी नुकताच देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे देशातील ३११ प्रदूषित नद्यांपैकी महाराष्ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या सर्वेक्षणातही या ५५ नद्यांचा प्रदूषित यादीत समावेश होता. यावरून स्वच्छतेसाठी राज्य सरकारकडून कुठलेही पाऊले उचलण्यात आलेली नाही, हेच यातून दिसून येते.
यावर्षी ६ नोव्हेंबर २०२३ मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्र शाषित प्रदेशातील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश-१९ ,बिहार-१८ ,केरळ -१८ ,कर्नाटक येथील १७ नद्यांचा समावेश आहे. संस्थांनी गोळा केलेल्या नद्यांतील पाण्याच्या नमुण्यातील फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलाॅजिकल, मेटल्स आणि पेस्टीसाईड मापदंड आधारावर नद्यांचे प्रदूषण ठरविले आहे. विशेषत: पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण (बीओडी) गृहीत धरले आहे. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाय योजने नुसार १ ते ५ पर्यंतचा प्राधान्य क्रम दिला आहे. सर्वाधिक प्रदूषित नदी प्राधान्य १ मध्ये तर सर्वात कमी प्रदूषित नदी प्राधान्य ५ मध्ये समाविष्ट केली जाते.
महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची प्राधान्यक्रमानुसार यादी
१) प्राधान्य १ : मिठी, मुठा, सावित्री, भीमा२) प्राधान्य २ : गोदावरी, मुळा, पावना, कन्हान, मुळा-मुठा
३) मध्यम प्रदूषित १८ नद्या : तापी, गिरणा, कुंडलिका, दरणा, इंद्रावती, नीरा, घोड, क्रिष्णा, रंगावली, पाताळगंगा, सूर्या, तितूर, वाघुर, वर्धा, वैनगंगा, चंद्रभागा, मोरना, मुचकुंडी४) सर्वसाधारण प्रदूषित : भातसा, पेढी, वेल, मोर, बुराई, कलू, कण, कोयना, मंजिरा, पेल्हार, पेनगंगा, वेणा, वेण्णा, उरमोडी, पूर्णा, पांझरा, सीना
५) कमी प्रदूषित : कोलार, तानसा, उल्हास, अंबा, वैतरणा, वशिष्ठ, अमरावती, बोरी, गोमई, हिवरा, बिन्दुसारा
विदर्भातील नद्यांचे प्रदूषित पट्टेकन्हान : पारशिवनी ते कुही
वैनगंगा : तुमसर ते आंभाेरावर्धा : पुलगाव ते राजुरा
वेणा : हिंगणघाट परिसर क्षेत्रकाेलार : खापरखेडा, कन्हान व वारेगाव परिसर (वीज केंद्राचा परिसर)
प्रदूषणाची कारणे आणि उपाय
उद्योग : सर्व उद्योगांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र उद्योग प्रशासन प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एकतर लावत नाही किंवा लावल्या तर सतत सुरु ठेवत नाही किंवा प्रदूषण मंडळाचे लक्ष नाही.
सांडपाणी : अलीकडे उद्योगापेक्षा गावे, पालिका आणि महानगर पालिका क्षेत्रातून निघणारे सांडपाणी हे बहुतेक नद्या प्रदुषनास कारणीभूत आहेत. सांडपाण्यात मोठ्या प्रमाणावर, तेल, डीटरजंट, विविध जड धातू, रसायने, शहरातील नाल्यावाटे वाहत आलेला प्लास्टिक, जैविक कचरा, मल-मूत्र, जीव जंतू समाविष्ट असतात.
कृषी : शेतीमधील किटकनाषके, रासायनिक खते, जैविक कचरा. प्रदूषणासाठी इतर अनेक घटक कारणीभूत आहेत.