नागपूर : पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंतर्गत दरवर्षी रासायनिक तपासणी करण्यात येते. तर वर्षातून दोनवेळा जैविक तपासणी करण्यात येते. सन २०२१ ते २०२३ मध्ये करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत नागपूर जिल्ह्यातील ८७७३ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती. यात ६०१ जलस्त्रोत फ्लोराईड बाधीत आढळून आले होते. यातील ५५६ जलस्त्रोत बंद करण्यात आले आहे.
रासायनिक तपासणीमध्ये फ्लोराईड बाधीत आढळून आलेल्या ६०१ स्त्रोतांपैकी ४१८ हँडपंप, १३८ सार्वजनिक विहीरी तर ४५ नळ योजनेचे स्त्रोत होते. ६०१ स्त्रोतांपैकी ४१८ हँडपंप, १३८ सार्वजनिक विहीरींचे स्त्रोत पाणी पिण्यास बंद करण्यात आलेले आहेत. त्या ठीकाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. सर्व ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे.
‘हर घर जल’ हे ब्रिद असणा-या जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु आहे. नागपूर जिल्ह्यातील ७१७ गावे हर घर जल घोषित झाली आहेत. ग्रामीण जनतेला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.