नागपूर : ऑनलाईन गुंतवणूक केल्यास जास्त नफा होईल, असे आमिष दाखवत एका व्यक्तीची ५.५७ लाखांनी फसवणूक करण्यात आली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राजू शेखर कातोडे (४५, त्रिमूर्तीनगर) असे फसविल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना २७ जानेवारी रोजी ९९५७६५४१२६ या क्रमांकावरून एक फोन आला व समोरील व्यक्तीने गुंतवणूक केल्यास कमी वेळेत जास्त फायदा होईल, असे आमिष दाखविले. समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा ७ हजार इतका परतावादेखील दिला. त्यानंतर १० हजार रुपये घेऊन १५ हजार रुपये परत केले. यामुळे कातोडे यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून ५.५७ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. मात्र त्याचा कुठलाही नफा त्यांना दिला नाही व मूळ रक्कमदेखील परत केली नाही. कातोडे यांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोदेखील होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.