सावनेर / काटोल/ नरखेड/ कुही/ कळमेश्वर/ हिंगणा/ रामटेक/ उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल तीन महिन्यांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार, तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या ५६८० कोरोना चाचण्यांपैकी २४६ (४.३३) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता २२६६ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४०,८७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील १,३३,१९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०११ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १३ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ७, तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ३७ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ६, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ३९७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ५ , हिंगणा व डिगडोह येथे प्रत्येकी २, तर इसासनी, सावंगी आसोला, वागदरा, उमरीवाघ, गुमगाव व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,७७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १०७५८ कोरोनामुक्त झाले, तर २६९ रुग्णांचा मृत्यू झाला. कुही तालुक्यात २४८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत कुही व खोबना येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात १० रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राम्हणी न.प. क्षेत्रातील ५, तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात म्हसेपठार येथे २, तर सिंधी, सावंगी, चौदा मैल येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील १, तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४३६, तर शहरात १४५ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १, तर मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात ७ रुग्णांची नोंद झाली.
काटोलचा ग्राफ उतरला
काटोल तालुक्यात ४२० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आला. तीत ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ५, तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा व कोंढाळी केंद्राअंतर्गत प्रत्येकी १, तर येनवा केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात दोन रुग्णांची नोंद झाली.