लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असताना आता म्युकरमायकोसिसची चिंताही कमी होताना दिसून येत आहे. २० ते ३० जून यादरम्यान ९३ रुग्ण व १६ मृत्यूची नोंद झाली असताना मागील दहा दिवसात ५७ रुग्ण व ९ मृत्यू झाले. रविवारी शासकीय रुग्णालयात नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, खासगी रुग्णालयात दोन नवे रुग्ण आढळून आले. मागील दोन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.
नागपूर जिल्ह्यात मे महिन्यात म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले होते. या महिन्यात रोज १० ते १५ नव्या रुग्णांची भर पडत होती. परंतु आता ही संख्या दोन ते तीनवर आली आहे. २० जून रोजी रुग्णांची संख्या १५१५, मृतांची संख्या १३८, एकूण शस्त्रक्रिया १११०, तर रुग्णालयातून ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. ३० जूनपर्यंत रुग्णांची एकूण संख्या १६०८ झाली. दहा दिवसांत ९३ नव्या रुग्णांची भर पडली. १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर पोहोचली. १ ते ११ जुलै या १० दिवसात ५७ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या १६६५ झाली. ९ रुग्णांचे जीव गेल्याने मृतांची संख्या वाढून १६३ वर पोहोचली. या कालावधीत १०२ शस्त्रक्रिया झाल्याने ही १२९७ झाली, तर १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १३०७ वर गेली. सध्या शासकीय रुग्णालयात ११४, तर खासगी रुग्णालयात ८१ असे एकूण १९५ रुग्ण उपचार घेत आहेत.