रहाटेनगर टोलीत पोलिसांची धाडसी कारवाई : चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटीर उद्योगासारख्या घरातच गावठी दारूच्या भट्ट्या लावून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळणाऱ्या राहटे नगरातील टोली भागात अजनी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज दुपारी धडक दिली. तेथील चार महिलांच्या घरी छापे घालून हातभट्टीची ५८० लीटर दारू तसेच ३६० लीटर मोहाफुलाचा सडवा (रसायन)पोलिसांनी नष्ट केला.
या धाडसी कारवाईमुळे टोली परिसरात एकच धावपळ निर्माण झाली होती.
शताब्दी चौक ते बेसा चौक मार्गावर रहाटे नगर टोली ही वस्ती आहे. येथील झोपडपट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी कुटीर उद्योगासारख्या दारूच्या भट्ट्या लावल्या जातात. येथे गाळली जाणारी हातभट्टीची दारू शहरातील विविध भागात पाठविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू आहे. त्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे ठाणेदार विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी १ वाजता टोली भागात धडक दिली. करुणा मानकर, वनचाबाई हातागडे, श्रीमती लोंढे आणि आशा हातागडे या चौघींच्या घरी छापे घालून पोलिसांनी तेथून १३६० लीटर महाफुलाचा सडवा (रसायन) तसेच ५८० लीटर मोहफुलाची दारू असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व त्याच भागात नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे टोली भागात एकच धावपळ निर्माण झाली होती. पोलिसांनी उपरोक्त चौघींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शेंगर, उपनिरीक्षक बडवाईक, गिडसे तसेच अजनीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, शीतलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक सखाराम कांबळे, हवालदार हेमराज पाटील, नीलेश इंगळे, अतुल दवंडे, हंसराज पाऊलझगडे आदींनी सहभाग नोंदविला.
---