लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर सुरुवातीपासून उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात व्हेंटिलेटर लावण्यात आलेल्यांपैकी ५९ टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. हा आकडा २ हजारांहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मेयो रुग्णालयाकडे विचारणा केली होती. मेयोमध्ये १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत किती कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले, त्यातील किती जणांचा मृत्यू झाला, किती रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २७ एप्रिल २०२१ पर्यंत मेयोमध्ये ३ हजार ५०२ रुग्णांना विविध व्हेंटिलेटर्सवर ठेवण्यात आले. त्यापैकी १ हजार ४२१ रुग्ण बरे झाले तर २ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाला.
१३ महिन्यांत ओपीडीत १० हजार कोरोना रुग्ण
१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत मेयोच्या ओपीडीमध्ये १५ हजार ७६२ कोरोना संशयित रुग्ण आले. यातील १० हजार ३४७ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात व ८ हजार १४५ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार झाले. ३१ मार्चपर्यंत मेयोमध्ये १ हजार ४८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर २६६ रुग्ण ब्रॉटडेड होते.
४१६ कोव्हिड डिलिव्हरी
१३ महिन्यांच्या कालावधीत मेयोमध्ये कोरोना झालेल्या ४१६ महिलांची डिलिव्हरी झाली. यातील २१२ प्रकरणांत नॉर्मल डिलिव्हरी झाली. कोरोना झालेल्या १२ मातांचा मृत्यू झाला.
स्वाईन फ्लू, डेंग्यूमुळे एकही मृत्यू नाही
या काळात मेयोच्या औषधवैद्यक शास्त्र विभागामध्ये स्वाईन फ्लू किंवा डेंग्यूमुळे एकही मृत्यू नोंदविल्या गेला नाही. तर कर्करोगामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला.