सुशिक्षित मतदारांकडूनही मतदानात चुका : ‘नोटा’चाही वापर जितेंद्र ढवळे- नागपूर पदवीधरच मतदार असल्याने सुशिक्षितांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या पदवीधर मतदारसंघात मतदान करताना एक नव्हे तर तब्बल ५९७३ मतदार चुकले. त्यामुळे त्यांची मते अवैध ठरली. सुशिक्षित मतदारांच्या अशिक्षितपणाचेच हे उदाहरण ठरावे.उच्चशिक्षित मतदारांचा भरणा असलेल्या या निवडणुकीत मतदान करताना चुका अपेक्षित नसतात. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक नसली तरी मतदानाची प्रक्रिया किचकटही नसते. सार्वत्रिक निवडणुकीत पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढील बटन दाबावे लागते तर येथे मतदारांना उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम लिहावा लागतो. मात्र तरीही दरवेळी मतदान करताना सुशिक्षित मतदार चुकतातच. यंदाही पाच हजारावर मतदारांनी चुका केल्या. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मते वैध ठरली. काही मतदारांनी पसंतीक्रम टाकण्याऐवजी फक्त ‘राईट मार्क’ केले. काहींनी ‘नोटा’चा (नकारात्मक मतदान) पर्याय निवडताना मतपत्रिकेवरील इतर उमेदवारांच्या नावापुढेही पसंतीक्रमांक टाकला. काही मतदारांनी मतपत्रिकेवरील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे ‘राईट मार्क’ केले, पसंतीक्रमांक टाकलाच नाही. काहींनी इंग्रजी आणि मराठी आकड्यांचा वापर केला. काही मतदारांनी पसंतीक्रमांकासोबतच खाली स्वाक्षरी करण्याचाही प्रयत्न केला. अशाच प्रकारच्या इतरही चुका मतदारांनी केल्याचे मतमोजणीदरम्यान आढळून आले. ११ उमेदवारांची अनामत जप्तनिवडणूक रिंगणात १४ उमेदवार होते. यापैकी प्रा. अनिल सोले विजयी ठरले. उर्वरित १३ पराभूत उमेदवारांपैकी बबन तायवाडे आणि किशोर गजभिये यांचा अपवाद सोडला तर इतर ११ ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अनामत रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या १/६ मते (१५,६८०) उमेदवारांना प्राप्त करायची होती. वरील दोन उमेदवार वगळता एकही उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकला नाही. एका उमेदवाराने दोनशेचा, एकाने शंभरचा पल्ला गाठला. चार उमेदवारांना पन्नासपेक्षा कमी मते मिळाली.
५९७३ पदवीधर नापास !
By admin | Published: June 25, 2014 1:27 AM