५ जी म्हणजे आहे तरी काय?
५जी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन सेल्युलर टेक्नॉलॉजी’! पहिले जनरेशन म्हणजे मोबाईलवर फक्त ‘व्हॉईस कॉल’, २ जी म्हणजे ‘एसएमएस’ ही ‘मेसेजिंग’ सुविधा, ३ जी म्हणजे मोबाईलवर इंटरनेट आणि ४ जी म्हणजे अधिक स्पीड असलेले इंटरनेट ज्यावर ओटीटी व अन्य सुविधा वापरता येतील. ५ जी स्पेक्ट्रम स्पीडमुळे स्वयंचलित गाड्या, अधिक स्पीडचे ‘आयओटी’, दूरवरच्या शस्त्रक्रिया आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिॲलिटी) चे वेगवेगळे आविष्कार मोबाईलवर साकारतील. ४जीच्या शंभरपट स्पीड मिळेल. मनोरंजनाशिवाय टेलिमेडिसीन, टेलिएज्युकेशन या आरोग्य, शिक्षणाच्या अद्ययावत सुविधा ५जी मुळे सर्वत्र उपलब्ध होतील.
दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका पुढे
जग, विशेषत: दक्षिण कोरिया, चीन व अमेरिका हे देश ५जी बाबत आपल्या खूप पुढे आहेत. या देशांमधील प्रत्येकी ५० शहरांमध्ये सध्याच ५जी सेवा उपलब्ध आहे. भारतात अजूनही ते स्वप्नच आहे. त्याचे कारण या सेवेसाठी ‘ऑप्टिकल फायबर केबल’चे (ओएफसी) नेटवर्क आणि मोबाईल टॉवरची संख्या खूप वाढविण्याची गरज आहे. टॉवर्सची संख्या खूपच कमी असल्यामुळे सध्या भारतात ‘ब्रॉडबॅन्ड पेनिट्रेशन’ अवघे ७ टक्के आहे. युरोप किंवा उत्तर अमेरिकेत ते ७५ टक्के आहे. ‘वेव्हलेंग्थ कॅरिअर’ मर्यादित असल्याने रेडिएशन (किरणोत्सर्ग) अधिक होते, असा आक्षेप आहे. भारतातील ‘ओएफसी नेटवर्क’ जेमतेम २५ लाख किलोमीटर आहे आणि ५जी सुविधा पूर्ण क्षमतेने वापरायची असेल तर हे जाळे किमान तिपटीने वाढविण्याची गरज आहे. हे असे आकडे सांगण्याइतके सोपे नाही. दूरसंचार मंत्रालयाच्याच अंदाजानुसार सरकार व मोबाईल कंपन्यांनी खूपच जोर लावला तरी ७५ लाख किलोमीटरचे जाळे तयार व्हायला २०२२ चा डिसेंबर उजाडेल.
पुन्हा ग्राहकांवरच भुर्दंड का?
मुळात ५जी स्पेक्ट्रमचे लिलावच अजून झालेेले नाहीत. मुळात भारतात स्पेक्ट्रम खूप महाग आहे. त्यामुळेच मोबाईल सेवा खूप महाग झाली आहे. ग्राहकांकडून प्रचंड पैसा वसूल केल्यानंतरही बहुतेक मोबाईल कंपन्या भयंकर तोट्यात आहेत. २ जी स्पेक्ट्रमचा लिलाव, त्यात कथितरीत्या झालेले राष्ट्रीय नुकसान, आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याविरुद्ध उठवलेला आवाज, ए. राजा-कनिमोळी व इतरांविरुद्धचा खटला, त्यातून ते निर्दोष सुटल्यामुळे भाजपवर होणारी टीका, हा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तर ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव हे दिसते तितके सरळ प्रकरण राहणार नाही. अर्थात, रिलायन्सचे अंबानी किंवा एअरटेलचे मित्तल कितीही दावा करीत असले तरी खऱ्या अर्थाने भारतात स्मार्ट फोन ५ जीच्या स्पीडने चालतीलच असे नाही. घोषणा झाली तरी मिळणारी सेवा ५ जी नसण्याचीच शक्यता अधिक आहे.
चिनी कंपन्यांना पर्याय काय?
या स्वप्नांच्या पूर्ततेतील आणखी एक अडथळा म्हणजे चीनशी सध्या सुरू भारताचा पंगा. नोकिया, इरिक्सन व हुवेई या कंपन्या सध्या ५जी सेवा देण्यासंदर्भात आघाडीवर आहेत. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची सेवा खास भारतीय असेल व त्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे सांगितले असले तरी ते अजून पूर्णपणे सिद्ध व्हायचे आहे. चिनी कंपन्यांची अजिबात मदत घ्यायची नाही, असे सरकारचे सध्याचे धोरण आहे. ते तसेच राहिले तर भारतात ५जी चे स्वप्न साकारण्यात आणखी अडचण तयार होईल.
--------------------------------------------------