नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रभाव कमी झाला आहे. मागील २२ दिवसात ४३८ रुग्ण तर १५ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ६ तर ग्रामीणमधील २ आहेत. गुरुवारी ९ रुग्णांची भर पडल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७९५ तर मृतांची संख्या १०,११५वर पोहचली आहे. आज २१ रुग्ण कोरोनातून बरे झाले.
पावसामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात असलीतरी मागील चार दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या दहाच्या आत आहे. तर, सहा दिवसांपासून मृत्यूची नोंद नाही. आज शहरात ५१५१ तर ग्रामीणमध्ये २५५ असे एकूण ५४०६ चाचण्या झाल्या. यात ४६९७ आरटीपीसीआर तर ७०९ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. नागपूर जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत ०.१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात ७ रुग्ण आढळून आल्याने पॉझिटिव्हिटीचा दर ०.१३ टक्के तर ग्रामीणमध्ये केवळ एकच रुग्ण आढळून आल्याने पॉझिटिव्हीटीचा दर ०.३९ टक्क्यांवर आला आहे.
-शहरात २९०, ग्रामीणमध्ये १३० रुग्ण
मागील २२ दिवसांत शहरात २९० तर ग्रामीणमध्ये १३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर, १६ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. सध्या शहरात २०६, ग्रामीणमध्ये ५३, जिल्हाबाहेरील ८ असे एकूण २६७ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील २०४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत.
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ५४०६
शहर : ७ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,७९५
ए. सक्रिय रुग्ण : २६७
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,४१३
ए. मृत्यू : १०११५