लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने गुरुवारी महाल, बडकस चौक ते कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधा निर्माण करणारी सहा दुकाने जेसीबीच्या मदतीने तोडण्याची कारवाई केली.
डीपीसी प्लाननुसार सीए रोड ते बडकस चौक, कोतवाली पोलीस स्टेशनसमोरून सीपी ॲण्ड बेरारपर्यंतचा रस्ता रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्याअंतर्गत गुरुवाारी पोलीस पथकाच्या उपस्थितीत प्रस्तावित रस्त्याच्या मधात येणाऱ्या सहा दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. यासोबतच या रोडवरील इतरही अतिक्रमण हटवीत २ ट्रक सामान जप्त करण्यात आले. मनपाच्या दुसऱ्या पथकाने मंगळवारी झोनअंतर्गत पागलखाना चौक ते कल्पना टॉकीज चौक, अवस्थीनगर चौक ते दिनशॉ फॅक्टरी चौक, बोरगाव ते गोरेवाडा चौक, गिट्टीखदान चौक ते जुना काटोल नाका, पोलीस तलाव ते परत अवस्थीनगर चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटविण्यात आले. १ ट्रक सामान जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, मनपा उपायुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.