लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी मोतिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिल्लीवरून प्रशिक्षण घेऊन आलेल्या चार श्वानांचा समावेश त्यांच्या हस्ते आरपीएफमध्ये करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दल विविध उपाययोजना करीत आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या नऊ पोस्टला चारचाकी वाहने पुरविण्यात येणार आहेत. यात छिंदवाडा, नागभीड, इतवारी, भंडारा, गोंदिया, राजनांदगाव, डोंगरगड, नैनपूरचा समावेश आहे. याशिवाय ८६ वॉकीटॉकी रेल्वे सुरक्षा दलासाठी मागविण्यात आल्या आहेत. रेल्वेगाड्यात गस्त घालणाऱ्या आरपीएफ जवानांसाठी ३० बॉडी वेअर कॅमेरे मागविण्यात आले आहेत. यात १० तास चित्रीकरण करण्याची सुविधा राहणार आहे. पूर्वी दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात १० बॉडी वेअर कॅमेरे होते. रात्री गस्त घालताना आरपीएफ जवानांना दूर पाहता यावे यासाठी ५६ टॉर्च मागविण्यात आले आहेत. अंधारात दीड किलोमीटरवरील दृश्य या टॉर्चच्या साह्याने पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त अमर कुमार स्वामी, निरीक्षक डोंगरे, सहायक उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन उपस्थित होते.आरपीएफच्या पथकात चार प्रशिक्षित श्वानदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात चार प्रशिक्षित श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीच्या दया वसती येथून हे श्वान आठ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत. विविध झोनमधील श्वानात या चारही श्वानांचा प्रथम क्रमांक आला आहे. यातील दोन श्वान गोंदिया आरपीएफमध्ये तर दोन श्वान नागपूर विभागात सेवा देणार आहेत. नागपूर विभागातील मोतिबागमध्ये लेब्राडोर जातीचा रॉकी आणि जर्मन शेफर्ड जातीचा मॅक्स हे श्वान सेवा देतील. स्फोटकांचा शोध घेण्याची क्षमता या श्वानांमध्ये आहे. दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात छिंदवाडा, नैनपूर, राजनांदगाव आणि नागभीड येथे श्वान पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी श्वान खरेदी करून ते प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत.
गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 8:59 PM
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी मोतिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देआर. एस. चौहान यांची माहिती : रेल्वे सुरक्षा दलात चार श्वानांचा समावेश