RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अॅक्शन; या नेत्यांवर आली टाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:32 IST2025-01-20T17:31:17+5:302025-01-20T17:32:07+5:30
काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, २० सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता...

RSS विरोधातील निदर्शनात सहभागी झाले नाहीत काँग्रेसचे 60 नेते, पक्षाने घेतली अॅक्शन; या नेत्यांवर आली टाच
राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. यानंतर, भागवतांच्या या विधानाचा काँग्रेसने निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला, परंतु अनेक काँग्रेस कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. आता काँग्रेसने अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करत एकूण ६० कार्यकर्त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. ज्या नेत्यांवर काँग्रेसने कारवाई केली, ते युवा शाखेचे सदस्य अथवा पदाधिकारी आहेत. काँग्रेसने काढून टाकलेल्यांमध्ये काही उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, २० सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसने १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय प्रमुख उदय भानू यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता.
महत्वाचे म्हणजे, या मोर्चात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल रावतही उपस्थित होते. पण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी, तसेच आ. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे यांचाही समावेश आहे. रविवारी संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी देवडिया भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. त्यात अनेक पदाधिकारी पोहोचलेच नव्हते. या आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील वाद समोर आला. रविवारी रात्री उशिरा या नेत्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचे आदेश जारी करण्यात आले. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा यांनी हा आदेश जारी केला.
याच बरोबर, अनुराग भोयर आणि मिथिलेश कान्हेरे यांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. हे सर्व नेते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव होते. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
यानंतर, आता प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधातच काही पदाधिकारी बोलू लागले आहेत. कुणाल राऊत यांनाच पदावरून हटवावे. राऊत हे निष्क्रिय आहेत. त्यांनी युवक काँग्रेस वाढवण्यासाठी काहीच केले नाही, असे आरोप युवक काँग्रेसमधून काढण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे आहोत, यामुळेच आमच्यावर कारवाई झाली, असा आरोपही काहींनी केला आहे.
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देवडिया भवनावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असतानाच विनापरवानगी आंदोलन केल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस-कार्यकर्त्यांची झटापट झाली व काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
राम मंदिर बनल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वक्तव्य सरसंघचालकांनी काही दिवसांअगोदर केले होते. त्यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी टीकादेखील केली होती. नेमके रविवारी नागपुरात युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा हे नागपुरात होते. देवडिया भवनात झालेल्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतदेखील उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व आंदोलन करत संघाच्या गणवेशातील खाकी पँट जाळली. तसेच संघावर बंदी आणावी अशा मागणीचे फलक दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.