योगेश पांडे
नागपूर : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. विशेषत: वाघाच्या हल्ल्यामुळे अनेक भागांत भीतीचे वातवरण आहे. या वर्षातच नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाघाच्या हल्ल्याच्या ६० घटना समोर आल्या आहेत, तर रानडुकराच्या हल्ल्यामुळे १० हजारांहून अधिक शेतांमधील पिकांचे नुकसान झाले. विधानपरिषदेत यासंदर्भात रामदास आंबटकर, नागो गाणार व प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात ३८, तर गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या २२ घटना समोर आल्या, तर रानडुकरामुळे गडचिरोलीत ३८६, चंद्रपूर जिल्ह्यात ८ हजार ६१३ व वर्धा जिल्ह्यात १ हजार २९ शेतातील पिकांचे नुकसान झाले. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत सौरऊर्जा कुंपणासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची सुरुवात झाली आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला २० लाख रुपये भरपाई देण्यात येत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
हत्तीच्या हल्ल्यात ‘ती’ महिला जखमी नाही
ऑक्टोबर २०२२ मध्ये गडचिरोलीतील लेकुरबोडी येथे जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला होता. त्यात ८० वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या महिलेला हत्तींच्या कळपाने जखमी केले नव्हते. हत्ती गावात आले असताना घाईत खाटेवरून उठताना महिला खाली पडली होती व जखमी झाली होती, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.
हत्तीच्या हल्ल्यावरील नियंत्रणासाठी ‘हुल्ला पार्टी’ची मदत
गडचिरोलीमध्ये जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला असून त्यांच्यावर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. वनविभागाकडून गस्ती पथक तर तयार करण्यात आले आहेच. शिवाय ‘हुल्ला पार्टी’ची मदतदेखील घेण्यात येत आहे. यात पश्चिम बंगालमधील १४ जणांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून वनमजुरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच थर्मल ड्रोन व ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून हत्तींच्या कळपाचा ठावठिकाणा शोधण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.