नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वेच्या पार्सलमधून नागपुरातून एका व्यक्तीने ६० लाखांची रोकड पाठविली. रेल्वे सुरक्षा दलाने ती मुंबईत पकडल्याने संबंधित वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ‘पार्सल’च्या माध्यमातून कोट्यवधींची रोकड इकडून तिकडे केली जात असल्याचे वृत्त २ एप्रिलला 'लोकमत'ने ठळकपणे प्रकाशित केले होते. आजच्या कारवाईमुळे या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे सर्वत्र सढळ हाताने पैसा उधळला जात असल्याची सर्वत्र ओरड आहे. प्रचार यंत्रणा राबविणाऱ्या कार्यकर्त्यांची साग्रसंगीत व्यवस्था करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येतो.
मतदान प्रक्रियेतील या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणच्या निवडणूक यंत्रणांसह पोलिसांनी सर्वत्र स्पॉट लावले आहेत. शहराशहरात आणि शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या गावांच्या सीमांवर विविध वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अनेक ठिकाणी मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन नोटांची हेरफेर करणाऱ्यांनी रेल्वे गाड्यातील पार्सल डब्यांचा आश्रय घेतला आहे. या संबंधीची कुणकुण कानावर आल्यामुळे लोकमतने २ एप्रिलच्या अंकात या संबंधिचे वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे अलर्ट झालेल्या आरपीएफने पार्सल डब्यावर लक्ष केंद्रीत करून नागपूरहून मुंबईला गेलेल्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये आज ६० लाखांची रोकड पकडली. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय नामक व्यक्तीने ही रोकड कपड्यांच्या कर्टनमधून पार्सलमधून रेल्वेने मुंबईला पाठविल्याचे उघड झाले आहे. यासंबंधाने मुंबईतून चाैकशी केली जात असल्याचे सांगितले जाते.
व्यापाऱ्याची चाैकशी सुरूही रोकड पाठविणारा व्यापारी नागपुरातील रहिवासी असून त्याचे पूर्ण नाव उघड करण्यास सूत्रांनी नकार दिला आहे. ही रोकड कोणत्या हेतूने आणि कुणासाठी पाठविली त्याची चाैकशी सुरू असल्याने तूर्त यावर विस्तृतपणे बोलता येणार नसल्याचे संबंधित अधिकारी म्हणतात. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.