लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत आतापर्यंत नदी सफाईचे काम जवळपास ६० टक्के झाले आहे. पोहारा नदी सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिवळी नदीचे ६० टक्के तर नाग नदी स्वच्छतेचे ५७ टक्के काम झाले आहे. शहरात २३२ नाले आहेत. यापैकी १२५ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. १५५ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ७७ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करावी लागते. आतापर्यंत मशीनद्वारे २१ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे, तर मनुष्यबळाद्वारे १०४ नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली आहे.
नदी व नाले स्वच्छता कामाचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील व्हर्च्युअल बैठकीमध्ये आढावा घेतला. यावेळी निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या. स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल अधिकारी व्हर्च्युअल बैठकीमध्ये जुळले होते. ३१ मेपर्यंत नदी, नाले स्वच्छता मोहीम पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये, काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग रस्ता दुभाजकांवर झाडे लावण्यासाठी केला जावा, असे निर्देश महापौरांनी दिले.
नाग नदीच्या शेवटच्या पॅचमेंटच्या स्वच्छतेसाठी आवश्यक मशीन उशिरा मिळाल्याने या कार्याला थोडा विलंब होणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली.
...
सतरंजीपुरा झोनमधील १८ नाल्यांची सफाई
सतरंजीपुरा झोनमध्ये एकूण २२ नाले आहेत. यापैकी १८ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई करावी लागते. विशेष म्हणजे झोनमधील मनुष्यबळाद्वारे सफाई करावी लागणाऱ्या सर्व १८ नाल्यांची मुदतीपूर्वीच सफाई करण्यात आलेली आहे.
...
नदीकाठावर वृक्षारोपण करा
नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरा नदीपासून सुरुवात केली जार्ईल. यामध्ये फळ, औषधींची झाडे लावण्यात येणार आहेत. यात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वनऔषधी, फळ वृक्षारोपण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर यांनी दिले.