शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : ५ नोव्हेंबरपर्यंत जागा भरण्याचे निर्देशनागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (पीजी) यावर्षीपासून ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत या जागा भरण्याचे निर्देशही केंद्र शासनाने दिल्याची माहिती आहे.भारतात १५० शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांपैकी एकट्या महाराष्ट्रात ६५ महाविद्यालये आहेत. मध्य भारतातील सर्वात मोठे महाविद्यालय म्हणून नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची ओळख आहे. या महाविद्यालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूषृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातर्फे पीजीच्या जागांची माहिती देण्यात आली होती. परिणामी, जागेचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘पीजी’च्या प्रवेश प्रक्रियेस ६० विद्यार्थ्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव महाविद्यालय प्रशासनाला केंद्र शासनाकडे पाठविला होता. प्रस्ताव मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या आयुष व सेंट्रल कौन्सिल इंडियन मेडिसीन (सीसीआयएम) च्या चमूने मार्च २०१५ मध्ये येऊन महाविद्यालयाचे निरीक्षण व तपासणी केली होती. यात चमूने समाधान व्यक्त करून सकारात्मक अहवाल केंद्र शासनाकडे सुपूर्द केला होता. तब्बल सहा महिन्यानंतर केंद्र शासनाने ‘पीजी’ प्रवेशासाठी ६० विद्यार्थ्यांना मान्यता दिली. एमडी, एमएस आयुर्वेदचे एकूण १० विषय असून, एका विषयात सहा विद्यार्थी असे एकूण १० विषयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. (प्रतिनिधी)
‘पीजी’साठी ६० जागांची मान्यता
By admin | Published: October 30, 2015 3:01 AM