३०० विद्यापीठांपैकी ३० विद्यापीठांचाच वापर :
विदेशी विद्यापीठांशी संगनमत तर नाही ना?
आनंद डेकाटे
नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करते. यासाठी जगभरातील ३०० नामांकित विद्यापीठांचा विचार केला जातो. परंतु यापैकी केवळ ३० विद्यापीठांमध्येच विद्यार्थी जात असल्याचे दिसून येते. यातही महाराष्ट्रातून विदेशात शिष्यवृत्ती घेऊन शिकण्यासाठी जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी हे केवळ ९ विद्यापीठांमध्येच पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे विदेशी विद्यापीठांशी संगनमत तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना प्रदान केली जाते. दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मागील काही वर्षांचा विचार केला तर काही ठराविक विद्यापीठांमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याचे दिसून येते. यावर्षी एकूण ७५ पैकी ४४ विद्यार्थी हे केवळ ९ विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी गेले, तर उर्वरित ३१ विद्यार्थ्यांना २१ विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला. देशानुसार विचार केला तर अमेरिकेतील ६ विद्यापीठात महाराष्ट्रातून एकूण २४ विद्यार्थी गेले. यातही एकट्या न्यूयॉर्क विद्यापीठात १२ विद्यार्थी गेले. तर कोलंबिया विद्यापीठात ६ विद्यार्थी आणि उर्वरित चार विद्यापीठात ६ विद्यार्थी गेले. इंग्लंडमध्ये एकूण १४ विद्यापीठात २८ विद्यार्थी गेले. यातही युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमध्ये ५ आणि युनिव्र्हसिटी ऑफ एडिनबर्गमध्ये ४ विद्यार्थी, तर उर्वरित १९ विद्यार्थी हे १२ विद्यापीठात गेले. ऑस्ट्रेलिया येथील ४ विद्यापीठात एकूण २० विद्यार्थी गेले. यातही युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये ९ व न्यू साऊथवेल्समध्ये ५ विद्यार्थी गेले. मेलबर्न विद्यापीठात ३ विद्याथी गेले. तसेच सिंगापूर, नेदरलँड व इस्रायलमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला. असे केवळ ९ विद्यापीठात ४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर ३१ विद्यार्थी हे इतर २१ विद्यापीठात गेले.
- बॉक्स
आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यावर अधिक मेहरबानी १०० पेक्षा कमी मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नाही. तर १०० पेक्षा अधिक मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ६ लाख रुपयापर्यंतची उत्पन्नाची अट आहे. एकूण ७५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ विद्यार्थ्यांना १०० पेक्षा जास्त मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला. तर तब्बल ६९ विद्यार्थी हे १०० पेक्षा कमी मानांकन असलेल्या विद्यापीठात गेले. म्हणजेच या शिष्यवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांवर अधिक मेहरबानी असल्याचे दिसून येते.
- बॉक्स
जागा वाढविण्याची गरज
परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्येसुद्धा ही शिष्यवृत्ती दिली जाते. ते १०० ते ४०० पर्यंत विद्यार्थी विदेशात पाठवितात. महाराष्ट्र सरकारनेही यात वाढ करावी. तसेच मानांकन हे विषयानुसार असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले, त्यांची कारणेसुद्धा सांगायला हवी. एकूणच पारदर्शकता यावी.
डॉ. सिद्धांत भरणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन