- सुनील चरपेलाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पीकविमा याेजनेंतर्गत अंबिया बहार संत्र्याचा फळ पीकविमा काढायचा झाल्यास राज्यातील १३ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २० हजार रुपये प्रतिहेक्टर विमा हप्ता हा नागपूर जिल्ह्याच्या माथी मारण्यात आला असून, सर्वांत कमी (चार हजार रुपये) हप्ता बीड, हिंगाेली व पुणे जिल्ह्यांच्या वाट्याला गेला आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यासाठी विमा कंपनीला प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये मिळत असून, नुकसानभरपाईपाेटी परतावा मात्र ८० हजार रुपयांचा मिळताे. ताे मिळविण्यासाठी बराच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संत्रा उत्पादकांनी सांगितले.
अंबिया बहार संत्रा विम्यासाठी राज्यात शेतकऱ्यांचा वाटा प्रतिहेक्टरी ४ ते २० हजार रुपये ठरविण्यात आला असून, राज्य सरकारचा वाटा हा १३,२०० ते ३१,५०० रुपये आणि केंद्राचा वाटा १० हजार रुपयांचा आहे. २०२०-२१ पर्यंत अंबिया बहार संत्रा विमा काढण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी चार हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागायचा. सन २०२१-२२ मध्ये याचे ट्रिगर बदलले. शिवाय, विमा कंपनी आणि हप्त्यांची रक्कम ही तीन वर्षांसाठी अनिवार्य केली. नागपूर जिल्ह्याचा हप्ता पाच पटीने वाढवून २० हजार रुपये प्रतिहेक्टरी केला. विमा कंपनीला राज्य सरकार प्रतिहेक्टरी ३० हजार, तर केंद्र १० हजार रुपये देते. त्यामुळे कंपनीकडे प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये जमा केले जात असून, नुकसानभरपाईपाेटी कंपनी प्रतिहेक्टरी ८० हजार रुपये देते.
नुकसानभरपाईचे ट्रिगर कंपनीच्या फायद्याचे प्रतिहेक्टरी ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ६० हजार रुपयांचा हप्ता देण्याचा व त्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला २० हजार रुपयांचा हप्ता काेणत्याही पीक व फळ पीकविम्यासाठी नाही. विमा कंपन्यांचे उखळ पांढरे व्हावे, यासाठी सन २०२०-२१ मध्ये ट्रिगर बदलण्यात आल्याचा आराेप उत्पादकांनी केला आहे. विदर्भात आधी किमान ५० टक्के शेतकरी अंबिया बहार संत्र्याचा विमा काढायचे. ते प्रमाण आता १५ ते १८ टक्क्यांवर आले आहे.