पित्याविरुद्घ गुन्हा दाखल : ११ महिन्यानंतर झाला खुलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ६० हजार रुपयांसाठी एका युवकाने आपल्या अडीच महिन्याच्या चिमुकल्याला विकल्याची घटना शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नितीन डोमाजी तराडे (२८) रा. लालगंज असे आरोपीचे नाव आहे. नितीनचे पाचपावली येथील २४ वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. नितीन गारमेंटच्या दुकानात काम करतो. युवती केवळ तिसरा वर्ग उत्तीर्ण आहे. तिचे आईवडिल मजुरी करतात. नितीन शांतिनगरात युवतीसोबत पत्नीसारखा राहू लागला. दरम्यान युवती गर्भवती राहिली. लग्नाशिवाय रुग्णालयात बाळंतपण शक्य नव्हते. त्यासाठी नितीनने रुग्णालयात खोटे नाव सांगितले. युवतीने मे २०१६ मध्ये यशनीलला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर काहीच दिवसात नितीनने पत्नीला कोर्टात लग्न करण्याची माहिती दिली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. २० जुलै २०१६ रोजी नितीन पत्नीला कोर्टात घेऊन गेला. तेथे त्याचे भाऊसुद्धा आले. तेथे विविध कागदपत्रांवर तिच्या सह्या घेतल्या. त्यानंतर मुलाला एका दाम्पत्याकडे सोपविले. मुलाची विक्री केल्यानंतर नितीन पत्नीपासून दूर राहू लागला. तिला सोडून आपल्या आई-वडिलांकडे गेला. युवतीने कुटुंबीयांना ही घटना सांगितली. खूप दबाव टाकल्यानंतर नितीनने त्याचा मुलगा सुरक्षित असल्याचे सांगितले. परंतु युवतीला त्याच्यावर विश्वास वाटला नाही. तिने नितीनच्या कुटुंबीयांना तिच्या मुलाची भेट करण्याची विनंती केली. त्यांनी मदत न केल्यामुळे तिने मुलाचा शोध सुरू केला. त्यावर नितीनने मीना दिलीप देवघरे यांना मुलगा विकल्याचे समजले. तिने शांतिनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नितीन विरुद्ध गुन्हा दाखल केला.
६० हजारात मुलाला विकले
By admin | Published: June 22, 2017 2:07 AM