लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व महानगर नियोजन क्षेत्रात ६०० हून अधिक आरामशीन नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आरामशीन असलेल्या भागात आगीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निर्माणाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागण्याची घटना घडल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महापालिका क्षेत्रात ३५० तर महानगर क्षेत्रात जवळपास २५० आरामशीन आहेत. वास्तविक आरामशीन चालविताना अग्निशमन विभागाच्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु एकाही आरामशीनने नियमांची पूर्तता केलेली नाही. अनेक आरामशीन ब्रिटिशकालीन परवान्यावर सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना नाहीत. अशा परिस्थितीत आगीची घटना घडली तर मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.शहर व महानगर क्षेत्रातील आरामशीनच्या परवान्याचे नूतनीकरणदेखील झाले नाही. या धोक्याची कल्पना महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही आली आहे. यामुळे विभागाने वर्षभरापूर्वी आरामशीन मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. यात आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली होती, मात्र मशीन मालकांनी याची दखल घेतली नाही. आरामशीन चालविण्यासाठी वन विभागाचा परवानादेखील आवश्यक आहे. तर वन विभागाच्या या परवान्यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असल्याने अग्निशमन विभागाने वन विभागाला पत्र पाठवून अटींची पूर्तता न करणाऱ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशी सूचना केली आहे. अग्निशमन विभागाच्या पत्रानुसार वन विभागाकडून आवश्यक उपाययोजना नसलेल्या आरामशीनचे परवाने नूतनीकरण केले जात नसल्याने आरामशीन चालकांची आता धावपळ सुरू झाली आहे.मनपाच्या तिजोरीत येतील १२ कोटीआरामशीनच्या ठिकाणी बांधकाम करताना नगर रचना विभागाकडून बांधकामाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. आरामशीन चालकांनी बांधकाम मंजुरी व अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास यातून महापालिकेच्या तिजोरीत १२ ते १३ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो.सर्वाधिक आगीच्या घटना आरामशीनच्याशहरात आगीच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना आरामशीनला आग लागण्याच्या घडतात. परंतु असे असतानाही आरामशीनच्या ठिकाणी पाणी, हायड्रन्ट सुविधा उपलब्ध नाहीत. आरामशीनचा परवाना घेताना आग नियंत्रणाच्या सुविधा बंधनकारक आहेत.वन विभागाला पत्र पाठविलेआरामशीनचा परवाना घेताना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु शहर व महानगर क्षेत्रातील आरामशीन चालकांनी अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र घेतलेले नाही. यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आरामशीन चालकांनी पाणी, हायड्रन्ट यासारख्या आवश्यक बाबींची व्यवस्था केलेली नाही. याचा विचार करता अग्निशमन विभागाने वन विभागाला पत्र पाठविले आहे. आरामशीनचे परवाने नूतनीकरण करताना अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र असल्याशिवाय परवाना नूतनीकरण करू नये, असे यात म्हटले आहे.-राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी