भांडेवाडीतील जमीन प्रदूषणात तीन टक्क्यांची घट शक्य : स्वित्झर्लंडमधील संशोधकांचा दावायोगेश पांडे नागपूरशहरातील सर्वात मोठा बाजार असलेल्या कळमना बाजारात वर्षभरात सहा हजार टनांहून अधिक कचरा जमा होतो. जैविकदृष्ट्या विघटन होणे शक्य असलेला कचरा भांडेवाडी ‘डम्पिंग यार्ड’मध्ये फेकण्यात येतो व तो वाया जातो. मात्र या ‘वेस्ट’वर जर योग्य प्रक्रिया झाली तर यापासून वर्षभरात हजारो ‘गिगाज्युअल’ ऊर्जा निर्माण होऊ शकते. स्वित्झर्लंडमधून येऊन नागपुरातील कळमना बाजारातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचा अभ्यास करणाऱ्या दोन संशोधकांनी वैज्ञानिक अभ्यासातून हा दावा केला आहे. ‘नीरी’ येथे विकसनशील राष्ट्रांमधील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन पद्धतीसंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी झालेले स्वित्झर्लंडमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ अप्लाईड सायन्सेस अॅन्ड आटर््स’मधील ‘रिसर्च स्कॉलर’ थॉमस ग्रॉस व लेना ब्रेटेनमोसर यांनी कळमना बाजारातून निघणाऱ्या घनकचऱ्यावर वैज्ञानिक अभ्यास केला. सातत्याने सहा महिने अभ्यास केल्यानंतर येथील कचऱ्यापासून बायोगॅसच्या माध्यमातून किती प्रमाणात ऊर्जानिर्मिती होऊ शकते याची त्यांनी मांडणी केली आहे. कळमना बाजारातून प्रतिवर्षी ६२७८ टन जैविक घनकचरा निघतो. यातील बहुतांश कचरा हा जैविकरीत्या विघटन होणारा असतो. मात्र हा कचरा थेट भांडेवाडीत नेऊन टाकण्यात येतो. जर या कचऱ्याला विलग करून यावर अवायुजीवी विघटन (अनॅरॉबिक डिकम्पोझिशन) करण्यात आले व योग्य प्रक्रिया वापरली तर वर्षभरात १५ हजार ‘गिगाज्युअल’ बायोगॅस निर्माण होऊ शकतो. यात जर बाजारातील कचऱ्यासोबतच ‘फूडवेस्ट’देखील मिसळण्यात आले तर ऊर्जेत आणखी वाढ होऊ शकते, असा त्यांच्या अभ्यासातून निष्कर्ष समोर आला आहे. त्यांच्या या अभ्यासात आर. हस्च, एच.धर, एस.कुमार, सी. हुगी व टी. वेन्टजेन्स हेदेखील सहभागी होते.शहरातील कचऱ्याचे ‘डम्पयार्ड’ झालेल्या भांडेवाडीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाची योग्य प्रणाली नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याखाली येणाऱ्या जमिनीत वाढ होत आहे. ही समस्या दूर कशी होणार हा प्रश्न प्रशासनाला सतावत असतो. मात्र थॉमस ग्रॉसने केलेल्या अभ्यासात शहरातील ५१ टक्के कचरा हा जैविकरीत्या विघटन होणार असल्याचे समोर आले. कळमना बाजारातून ६२७८ टन कचरा निघतो व हा सर्व कचरा भांडेवाडीतच टाकण्यात येतो. कचऱ्याला योग्य प्रकारे विलग करण्यात आले व ऊर्जानिर्मितीसाठी यावर प्रक्रिया केली तर याचा फायदा होऊ शकतो. कळमन्यातून भांडेवाडीत जाणारा ८४ टक्के तर शहरातून जाणारा एकूण ३ टक्के कचरा कमी होऊ शकतो, असा दावा ग्रॉस यांनी केला.‘स्वच्छ भारत’ला मिळेल बळगेल्या सहा महिन्यांपासून आम्ही या कळमन्याच्या घनकचरा व्यवस्थापनावर वैज्ञानिक अभ्यास करत आहोत. विविध संस्थांकडून आकडेवारी एकत्रित केल्यानंतर आम्ही ‘जीआयएस’ (जिआॅग्रॉफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम) तसेच ‘एमएफए’च्या (मटेरिअल फ्लो असेसमेंट) माध्यमांचा वापर केला. यातून जमिनीचे प्रदूषण नक्कीच कमी होऊ शकते, असे समोर आले. घनकचऱ्याची समस्या यातून काही प्रमाणात निश्चित कमी होऊ शकते व ‘स्वच्छ भारत’ मोहिमेला बळ मिळेल, असे मत थॉमस ग्रॉस व लेना ब्रेटेनमोसर यांनी व्यक्त केले.
कळमन्यातील सहा हजार टन कचरा ‘ऊर्जास्रोत’
By admin | Published: April 12, 2017 2:01 AM