लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : विना राॅयल्टी रेतीच्या अवैध वाहतुकीचे दाेन टिप्पर पकडून भिवापूर पाेलिसांनी दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून दाेन वाहनासह १० ब्रास रेती असा ६० लाख ५० हजार रुपये किमतीचेा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर केली.
तुलाराम कवडू भाेयर (४०, रा. भिवापूर) व प्रमाेद नत्थूजी चव्हाण (३१, रा. पवनी, जि. भंडारा), अशी अटकेतील आराेपी वाहनचालकांची नावे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेतीच्या अवैध वाहतुकीविराेधात पाेलिसांनी कंबर कसली आहे. रेतीची वाहतूक बंद असताना, पाेलिसांच्या नजरेआड मध्यरात्री रेतीची चाेरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास एमएच-३६/एए-४८२१ व एमएच-३६/एफ-७५५५ क्रमांकाचे दाेन टिप्पर पवनीकडून भरधाव येताना आढळून आले. दाेन्ही टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यांच्याकडे रेतीची राॅयल्टी आढळली नाही. ही रेतीची चाेरटी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेन्ही टिप्परचालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी ३० लाख रुपये किमतीचे दाेन टिप्पर आणि ५० हजार रुपये किमतीची १० ब्रास रेती असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या नेतृत्वात वाहतूक पाेलीस राकेश त्रिपाठी, राजन भाेयर यांच्या पथकाने केली.