नागपूर : कळमना येथील चिखली चौकातील भाजी व्यापाऱ्याच्या फ्लॅटमधून ६० लाखांची रोख रक्कम चोरी झाली. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
चिखली चौकातील हनी आर्केड अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भाजीपाला व्यापारी पंकज निपाने (२५) राहतात. पंकजसोबत आणखी दोन भाऊ फ्लॅटमध्ये राहतात. तिन्ही भाऊ अविवाहित आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. कळमन्याच्या भाजी बाजारातून निपाने बांधव व्यवसाय करतात. पंकजचा एक भाऊ व्यवसायानिमित्त दक्षिण भारतात गेला आहे. पंकज आणि दुसरा भाऊ नागपुरात होते.
नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता दोन्ही भाऊ कळमना बाजारात गेले. सकाळी पावणेदहा वाजता मोलकरीण कामासाठी आली असता तिने फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसल्याने पंकजला माहिती दिली. त्यांनी फ्लॅटवर येऊन पाहिले असता एका कपाटात ठेवलेले ५५ लाख रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. याशिवाय काही दिवसांअगोदर निपाने कुटुंबीयांनी एक कार विकली होती. त्याची सुमारे सहा लाखांची रोखदेखील चोरट्यांनी लंपास केली. पंकजने कळमना पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सीसीटीव्हीत आढळला संशयित तरुण
पोलीस सीसीटीव्हीवरून आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक संशयित तरुण सकाळी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसला. आरोपी हा निपाणे कुटुंबीयांच्या परिचयातीलच असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निपाणे बंधूंकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे त्यांना माहीत होते. त्यामुळे पंकज आणि त्याचा भाऊ निघून गेल्यानंतर तो फ्लॅटमध्ये घुसला. भाजीपाल्याचा बहुतांश व्यवसाय रोखीने होत असल्याचे निपाणे बांधवांचे म्हणणे आहे. ते बऱ्याच काळापासून व्यवसाय करत आहेत.