लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी कामठी-घाेरपड मार्गावरील देवी मंदिर परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, १२ जनावरांची पाेलिसांनी सुटका केली. या कारवाईमध्ये एकूण ६ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार मंगेश काळे यांनी दिली. ही कारवाई साेमवारी (दि.२९) रात्री ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विशाल कंठीराम चोपकर (२२, रा. जवाहरनगर, पार्डी, जिल्हा भंडारा) व मोहम्मद मोईन मोहम्मद मोबिन कुरेशी (२१, रा. भाजीमंडी, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी-लिहिगाव-घाेरपड मार्गावरून गुरांची कामठी शहराच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या मार्गावरील देवी मंदिर परिसरात नाकाबंदी करून एमएच-४२/एके-७४७८ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.
त्या वाहनात १२ जनावरे काेंबली असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे कागदपत्रांच्या तपसणीवरून स्पष्ट झाले. शिवाय, ती सर्व जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेघांना अटक केली आणि गुरांची सुटका करीत वाहन जप्त केले. या कारवाईमध्ये पाच लाख रुपये किमतीचे वाहन आणि १ लाख १२ हजार रुपये किमतीची १२ जनावरे असा एकूण ६ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार मंगेश काळे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस कर्मचारी प्रमोद वाघ, मनोहर राऊत, अनिल बाळराजे, नीलेश राऊत, ललित शेंडे यांच्या पथकाने केली.