साडेचार वर्षांत संपत्तीत ६३ टक्क्यांनी वाढ; काँग्रेस उमेदवार ठाकरेंचा जोरात 'विकास'
By योगेश पांडे | Published: March 26, 2024 11:47 PM2024-03-26T23:47:52+5:302024-03-26T23:59:06+5:30
वार्षिक उत्पन्न २१९ टक्क्यांनी वाढले : सद्य:स्थितीत १० कोटींहून अधिक संपत्ती
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे विकास ठाकरे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. २०१९ मध्ये ठाकरे यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२४ या साडेचार वर्षांच्या कालावधीत ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीत तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नी मिळून एकूण ६ कोटी १८ लाख ११ हजार ३३० रुपयांची एकूण संपत्ती होती. त्यात १ कोटी ४८ लाख ११ हजार ३३० रुपयांची चल संपत्ती व ४ कोटी ७० लाखांच्या अचल संपत्तीचा समावेश होता. २०१९ पासून ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी विकास ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार ठाकरे व त्यांच्या पत्नी वृंदा यांच्या नावे मिळून एकूण २ कोटी ७१ लाख ७४ हजार ८१४ अधिकची चल संपत्ती आहे, तर ७ कोटी ३५ लाख ८१ हजार ६६७ रुपयांची अचल संपत्ती आहे. अचल संपत्तीमध्ये वानाडोंगरीत २.७९ एकर तसेच जून २०२३ मध्ये खरेदी केलेली ०.३३७ हेक्टर इतकी शेतजमीन, हिंगण्यातील मौजा नीलडोह येथे ५ हजार चौरस फुटांचा भूखंड, मौजा परसोडी येथे १४६४.५ व १६१४.५८ चौरस फुटांचा भूखंड, मौजा दाभा येथे हजार फुटांचा भूखंड, मौजा परसोडी शास्त्री लेआऊट येथील घर यांचा समावेश आहे.
ठाकरे व त्यांच्या पत्नीवर २ कोटी ९२ लाख ५८ हजार ६९ रुपयांचे कर्ज आहे. केवळ विकास ठाकरे यांच्याकडे १ कोटी २९ लाख ६५ हजार १८५ रुपयांची अचल संपत्ती व ६९ लाख १० हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
- वार्षिक उत्पन्नात तिपटीने वाढ
२०१८-१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न १५ लाख ७६ हजार ६६ इतके होते. २०२२-२३ मध्ये उत्पन्नाचा आकडा ५० लाख ३२ हजार ९३० इतक्यावर पोहोचला. साडेचार वर्षांतच वार्षिक उत्पन्नात २१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- दीड वर्षाअगोदर घेतली नवीन कार
शपथपत्रातील माहितीनुसार, ठाकरे व त्यांच्या पत्नीकडे मिळून १ कोटी ४८ लाख ११ हजार ३३० रुपयांची चल संपत्ती आहे. त्यात ५३.४ तोळे सोन्याचे दागिने व ५.०२ किलो चांदीचे दागिने, १ कोटी २ लाख ५२ हजारांची वाहने आहेत. त्यातील ७२ लाखांची कार विकास ठाकरे यांच्या नावावर जुलै २०२२ मध्ये विकत घेण्यात आली.
- कर्जाचा आकडादेखील वाढला
२०१९ साली ठाकरे व त्यांच्या पत्नीच्या नावावर ८७ लाख २१ हजार ८४९ रुपयांचे कर्ज होते. साडेचार वर्षांत संपत्तीप्रमाणे कर्जाचा आकडादेखील वाढला असून, सद्य:स्थितीत त्यांच्यावर २ कोटी ९२ लाख ५८ हजार ०६९ इतक्या रकमेचे कर्ज आहे.
-चार न्यायालयीन प्रकरणे
दरम्यान, ठाकरे यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. या प्रकरणात न्यायालयीन खटले सुरू आहेत. २०१४ साली हाच आकडा २५ इतका होता.
- ठाकरेंची संपत्ती
वर्ष : चल संपत्ती : अचल संपत्ती : कर्ज
२०१९ : १,४८,११,३३० : ४,७०,००,००० : ८७,२१,८४९
२०२४ : २,७१,७४,८१४ : ७,३५,८१,६६७ : २,९२,५८,०६९