नागपूर : संत रविदास आश्रय योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने चर्मकार समाजाच्या नागरिकांना व्यवसायासाठी गटई स्टॉल्स देण्याची योजना सन २०११ मध्ये सुरू झाली. परंतु प्रशासकीय अडचणी व इतर बाबींमुळे मागील १० वर्षांपासून हे प्रकरण रखडले होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबत बैठक घेऊन अडचणींचे निराकरण केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला ३० जानेवारी रोजी ६३ चर्मकार बांधवांना स्टॉल्स वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्मकार सेवा संघाच्या वतीने महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटई कामगारांच्या मुद्द्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, दिव्या धुरडे, उपनेता वर्षा ठाकरे, चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भय्यासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाब सोनेकर, सहकोषाध्यक्ष विजय चवरे, गटई कामगार अध्यक्ष भाऊराव तांडेकर आदी उपस्थित होते. उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, महापालिकेला एकूण १०६ अर्ज आले. यातील ३५ अर्जांना वाहतूक विभागाच्या वतीने नाहरकत प्रमाणपत्र मिळाले. १५ अर्जदारांनी महापालिकेकडे स्टॅम्प पेपरवर अर्ज केला. ३९ प्रकरणात समाज कल्याण विभागाच्या वतीने नोंदणीसाठी अर्ज पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली. महापालिकेला मिळालेल्या अर्जात १२ लाभार्थी निर्धारित पत्त्यावर मिळाले नाहीत. ५ अर्जदारांचा मृत्यू झाला. महापौर तिवारी म्हणाले, चर्मकार सेवा संघाच्या प्रतिनिधींशी समन्वयक साधून काम करण्याची गरज आहे. सर्व समाज बांधवांना स्टॉल मिळाले पाहिजेत. केंद्रीयकृत प्रक्रिया व्हावयास हवी. त्यासाठी महापालिका मुख्यालयात वेगळा कक्ष स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.
.............