लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सालेभट्टी फाटा परिसरात कारवाई करीत सुमाेमधून देशी दारूची चाेरटी वाहतूक करणाऱ्या एका आराेपीला अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या ७० पेट्या व सुमाे असा एकूण ६ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
अमर बबनराव सुकारे (२७, रा. वाॅर्ड नं. ५, भिवापूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस पथक उमरेड-भिसी-चिमूर मार्गावर गस्तीवर असताना, दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना त्यांना मिळाली. त्याआधारे सालेभट्टी फाटा परिसरात नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, एमएच-४०/एएफ-०२६ क्रमांकाची सुमाे थांबवून तपासणी केली असता, सुमाेमध्ये देशी दारूच्या ७० पेट्या आढळून आल्या. ही दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, आराेपीला ताब्यात घेत अटक करण्यात आली. या कारवाईत २ लाख ३५ हजार २०० रुपये किमतीची देशी दारू व ४ लाखाचे सुमाे वाहन असा एकूण ६ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला.
याप्रकरणी आराेपीविरुद्ध कलम ६५ (अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. आराेपीला भिवापूर पाेलिसांच्या सुपूर्द केले असून, पुढील तपास भिवापूर पाेलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पाेलीस हवालदार रमेश भाेयर, मदन आसटकर, राधेश्याम कांबळे, साहेबराव बहाळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.