लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांच्या पहिल्या पक्क्या दाढेवर उभ्या रेषा व खड्डे असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘डीप पीट अॅण्ट फिशर’ म्हटले जाते. यात अन्नकण अडकून पुढे कीड लागण्याची शक्यता अधिक असते. मुलांचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘पीट अॅण्ड फिशर सीलेंट’ हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. यात एका शाळेतील १२० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ‘डीप पीट अॅण्ड फिशर’चे ६५ विद्यार्थी आढळून आले, हे विशेष.मुलाचे दात वयाच्या सहाव्या महिन्यात निघायला सुरुवात होते तर सहाव्या वर्षी पहिली पक्की दाढ यायला सुरुवात होते. दाढ नवीन असल्याने कमजोर असते. ही दाढ तोंडात शेवटी असते. यामुळे ब्रश करताना त्या दाढेपर्यंत जात नाही. त्यामुळे दातावरील अन्नकण निघत नाही. या दाढीच्या पृष्ठभागावर दोन खोल खड्डे व उभ्या लाईन असतात. यात अन्नकण अडकून दात किडण्याची शक्यता असते. यावर कवच म्हणजे ‘पिट अॅण्ड फिशर सीलेंट’ लावले जाते. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर ‘पिट अॅण्ड फिशर सीलेंट’ कार्यक्रम राबविणे हाती घेतले आहे. याची सुरुवात १० फेब्रुवारी रोजी विवेकानंद नगर येथील हिंदी प्राथमिक शाळेतून करण्यात आली. याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिक्तिसक डॉ. देवेंद्र पातुरकर, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक, विभाग प्रमुख डॉ. रितेश कळसकर, जिल्हा मुख्य आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. दातिरा इकबाल, डॉ. सचिन खत्री व डॉ. विनोद पाकदूने आदी उपस्थित होते. यावेळी १२० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात ६५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या पक्क्या दाढेवर ‘डीप पीट अॅण्ट फिशर’ आढळून आले. यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व समोर आले. यामुळे आता इतरही शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कळसकर म्हणाले, ‘पीट अॅण्ड फिशर सीलेंट’ लावण्यासाठी पालकांचे संमती पत्रक आवश्यक आहे. ते मिळाल्यावरच बाल दंतरोगशास्त्र विभाग व सामाजिक दंतशास्त्र विभागाची चमू संबंधित शाळेत जाऊन मुलांच्या दाढेवर ते बसवेल.
'डीप पीट अॅण्ड फिशर'चे ६५ रुग्ण : नागपूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:02 PM
मुलांचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘पीट अॅण्ड फिशर सीलेंट’ हा कार्यक्रम प्रायोगिक स्तरावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व डेंटलचा सहभाग