लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद आहेत. अनेक महाविद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने यूजीसीने प्राध्यापकांनी ऑनलाईन अध्यापनावर भर द्यावा असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील सात विद्यापीठांमधील ८६ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन केले. विशेषत: ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या ६५ टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांनी व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्यावर भर दिला.सी.पी.अॅण्ड बेरार महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अजय कुळकर्णी यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील चारशेहून अधिक प्राध्यापकांचा प्रामुख्याने समावेश होता. यात कला शाखेतील ६१ टक्के, वाणिज्यमधील ९.९ टक्के, तर विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखेतील १०.२ टक्के प्राध्यापक होते.अध्यापनासाठी इंटरनेट व सोशल मीडियावर विविध मंच उपलब्ध आहेत. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार ६५.९ टक्के प्राध्यापकांनी अध्यापनासाठी व्हॉट्सअॅपचा उपयोग केला. ११.६ टक्के प्राध्यापकांनी गुगल क्लासरूमचा तर ८.९ टक्के प्राध्यापकांनी यूट्यूूबचा वापर केला.प्राध्यापक स्वत:ही करताहेत ‘डिजिटल लर्निंग’अनेक प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अभ्यास ही नवीन संकल्पना आहे. त्यामुळे ८८.२ टक्के प्राध्यापकांनी दररोज १ ते २ तासांचा वेळ स्वयंअध्ययनासाठी घालविला. यातील ६४ टक्के प्राध्यापकांनी मूक, स्वयम्, मूडल इत्यादी माध्यमांतून डिजिटल लर्निंगवर भर दिला.ही संधी की आव्हान?सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती ही शैक्षणिक क्षेत्रासमोरील आव्हान असल्याचे मत ५५.३ टक्के प्राध्यापकांनी व्यक्त केले. तर ३७.५ टक्के प्राध्यापकांनी ही संधी असल्याचे म्हटले. ७.२ टक्के प्राध्यापक व्दिधा मन:स्थितीत असल्याचे दिसून आले.-असा असावा परीक्षा पॅटर्नलॉकडाऊनमुळे विद्यापीठांतील परीक्षादेखील पोस्टपोन करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात याव्या याबाबतदेखील विचारणा करण्यात आली होती. ३४.३२ टक्के प्राध्यापकांनी उन्हाळी परीक्षा रद्द करून अंतिम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळी परीक्षांसोबत घेण्यात याव्या असे मत व्यक्त केले. तर ५१.८५ टक्के प्राध्यापकांनी अंतिम वर्ष वगळता सर्व परीक्षा महाविद्यालयांनी घ्याव्या अशी भूमिका मांडली. २४.४४ टक्के प्राध्यापकांनी याला अंशत: सहमती दर्शविली.