जगदीश जोशी
नागपूर : खुनाच्या दीड हजार घटनांमध्ये लिप्त असलेले ६५०० आराेपी पाेलिसांच्या टार्गेटवर आहेत. सक्रिय गुन्हेगारांची ‘बाजीराव’ खातीरदारी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची याेजना आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दाेन दिवसात १४०० आराेपींची पाेलीस स्टेशनमध्ये आणून चाैकशी करण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हत्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेत पाेलिसांनी ही माेहीम सुरू केली आहे.
गेल्या १२ दिवसांत खुनाच्या ८ घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि पाेलिसही त्रस्त झाले आहेत. पाेलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताच अमितेशकुमार यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची माेहीम उघडली, ज्याचे व्यापक परिणामही दिसायला लागले. मात्र अचानक खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पाेलिसांच्या माथ्यावर आठ्या पडल्या आहेत. नुकतीच झालेली हत्येची घटना जुन्या वैमनस्यातून किंवा तात्कालिक कारणाने झाली. आराेपी चेतन हजारेने १९ वर्षानंतर वडिलांच्या खुनाचा बदला घेत बाल्या बिनेकरला संपविले. अपराध्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस लक्षात येत नसल्याने खुनाचा ग्राफ वाढला आहे. त्यामुळे पाेलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ही माेहीम सुरू करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षात खुनाच्या दीड हजार घटना घडल्या. यामध्ये ६,५०० गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील अनेक कुख्यात आहेत. त्यांच्याविराेधात एकाहून अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्यांचाही गुन्हेगारी जगतात दबदबा आहे. मात्र एखादी घटना घडल्यानंतरच पाेलीस सक्रिय हाेतात. पाेलीस आयुक्तांनी या गुन्हेगारांवर देखरेख ठेवणे व त्यांच्याविराेधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची पाेलीस स्टेशनमध्ये हजेरी घेण्यात येणार आहे. यासाेबतच हत्येच्या घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याअंतर्गत दाेन दिवसांत पाेलिसांनी १४०० आराेपींची चाैकशी केली. या माेहिमेची समीक्षा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी दिवसभर डीबी पथक, गुन्हे शाखा पथक, पाेलीस निरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हत्येच्या घटना तत्काळ राेखण्याचे आदेश पाेलीस आयुक्तांनी दिले. क्रिमिनल इंटेलिजन्स वाढविण्याची सूचना त्यांनी दिली. या माध्यमातूनच या घटना कमी केल्या जाऊ जाऊ शकतात.
नायलाॅन मांजा विक्रेत्यांची दुकाने सील करा
पाेलीस आयुक्तांनी नायलाॅन मांजाविराेधातही माेहीम कडक करण्याचे निर्देश दिले. नायलाॅन मांजा विक्रेत्यांना अटक करण्यासह असा मांजा तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांविराेधातही कठाेर कारवाई हाेणे आवश्यक आहे. दुकान किंवा कारखाना सील करून त्यांना धडा शिकविण्याचा इशारा त्यांनी दिला. पूर्ण शहरात नायलाॅन मांजाविराेधात अभियान चालवून पतंगबाजांवर धडक कारवाई करण्याचे कठाेर निर्देश आयुक्तांनी दिले.