लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा स्तरावरून पाठवावे लागतात. हे प्रस्ताव पाठविताना बँक खात्याची चुकीची माहिती भरल्याने ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होऊ शकली नाही. मुलींचे शिक्षणात गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुसूचित जाती व विमुक्त जाती भटक्या जमातींना दिली जाते. तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांनासुद्धा समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजक ल्याण विभागाला सादर करावा लागलो. शासनाकडून शिष्यवृत्तीचे अनुदान आल्यानंतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. शाळास्तरावरून शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देताना मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही. समाजकल्याण विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते चुकीचे आहे. काहींचे खाते आधारशी लिंक नाही. अशा काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील समाजकल्याण विभागात द्यायची होती. सध्या शाळा बंद असल्याने आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळांकडून त्रुटींची पूर्तता होऊ शकली नाही.येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँक खात्यातील त्रुटींची पूर्तता शाळेकडून करून न दिल्यास शिष्यवृत्तीची रक्कम शासनाच्या खात्यात परत जाणार आहे. कोरोनामुळे शाळा त्रुटींची पूर्तता करू शकली नाही. समाजकल्याण विभागातही शिष्यवृत्तीचा एकच टेबल आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना माहिती देण्यासाठी मुख्यालयातच यावे लागते. त्यामुळे त्रुटींची पूर्तता शक्य नाही. पंचायत समिती स्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
-शरद भांडारकर, सरचिटणीस, मनसे शिक्षक सेना