लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असणारे व सेवानिवृत्त शिक्षक आपल्या आर्थिक मागण्याकरिता वारंवार जिल्हा परिषदेत समस्या मांडत होते. अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळालेला नव्हता. या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले सेवाविषयक लाभ तत्काळ देण्यात यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले होते. त्यानुसार, शिक्षण विभागाने १९६७ पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रस्ताव सर्व गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेतले. जिल्हास्तरावर या प्रस्तावाची छाननी करून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. यात सेवानिवृत्त झालेल्या ६५२ शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर होऊनही त्यांना लाभ मिळाला नव्हता, तसेच ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत एकाच पदावर १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रस्तावही प्रलंबित होते. हे निकष पूर्ण करणाऱ्या १३६ सहा.शिक्षक व २ केंद्र प्रमुख व ५ उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यात आता वरिष्ठ श्रेणीचा प्रश्न मिटलेला आहे. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहा.प्रशासन अधिकारी अपूर्वा घटाटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी छाया वांदीले, वरिष्ठ सहा.उज्ज्वला बोंडे, अमर सातपुते, कविता चट्टे यांनी प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास सहकार्य केले.