लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला. तसेच दोन इसमांना अटक करण्यात आली. ही नकली दारू ड्राय डेच्या दिवशी शहरातील अवैध दारू विक्रीशी जुळलेल्या लोकांच्या माध्यमातून विकली जात असल्याची माहिती आहे.नकली दारूशी संबंधित आरोपीमध्ये आकाशनगर येथील अजय अशोक शेंडे आणि त्याचा साळा आशिष दरोटे याचा समवेश आहे.ड्राय डे च्या दिवशी मानेवाडा येथून मोठ्या प्रमाणावर वर्धा आणि चंद्रपूर येथे नकली दारू जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. ‘ब’ विभागाचे निरीक्षक प्रशांत गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत मानेवाडा रिंग रोड परिसरात पाळत ठेवून अजय अशोकराव शेंडे यास हिरो अॅक्टिव्हा क्र. एमएच. ४९ एएम ३९९० व बनावट मद्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या आकाशनगर येथील घरातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांची झाकणे व लेबल जप्त करण्यात आले. याशिवाय अजय शेंडेचा मेहुणा आशिष माणिकराव दरोटे याच्या अजनी परिसरातील घरातून बनावट विदेशी मद्यसाठ्यासह वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १८० मिलीच्या १४३४ बनावट मद्याच्या बाटल्या (३० पेटी) , १५०० बनावट झाकणे व लेबल, बनावट विदेशी दारु बॉटलींगचे साहित्य असा एकूण ६ लाख ५५ हजार ४७२ रुपयाच्या मुद्देमालासह वरील दोघांना अटक करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक स्वाती काकडे व उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रशांत गोतमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंदू दरोडे, जवान धवल तिजारे, विनोद डुंबरे, सुधीर मानकर, रेश्मा मते, समीर सईद व शिरीष देशमुख यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
नागपुरातील मानेवाड्यात ६.५५ लाखाची बनावट दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:24 PM
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देदोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई