जिल्ह्यात ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे नागपूर : नागपूर जिल्ह्यात १५ जुलै २०१५ पर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना ६०६ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. नागपूर जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज वाटपाचे खरीप हंगामाचे ८४१.५० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६०६ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. सोमवार व शुक्रवार या दिवशी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या बैठका होत आहेत. यात बँकांचे अधिकारी , सहकार विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहतात. याशिवाय जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन पीक कर्ज शिबिरे घेण्यात आली. या शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच बँकासुद्धा कर्ज देण्यास उत्सुक आहेत. ज्या राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे त्यात अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स, पंजाब अॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन व युनायटेड बँक आॅफ इंडिया, विजया बँक, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, करुर वैश्य बँक, कर्नाटका बँक, रत्नाकर बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, एमएस को-आॅपरेटिव्ह बँक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. (प्रतिनिधी)गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने अधिक वाटप गेल्यावर्षी १५ जुलैपर्यंत केवळ ३३९२१ शेतकऱ्यांना २८५ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच मागील वर्षी संपूर्ण खरीप हंगामात ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत ५५,२६२ शेतकऱ्यांना ४७७ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु या वर्षी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे १५ जुलैपर्यंत ६५,५२७ शेतकऱ्यांना तब्बल ६०६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, हे विशेष.
६५,५२७ शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज
By admin | Published: July 20, 2015 2:53 AM