एप्रिल महिन्यात मिळाला ३४ कोटींचा ७ लाखांचा महसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर विभागातील (शहर व ग्रामीण) ११०३ मद्याची दुकाने आणि बारपैकी ८२८ दुकाने व बार बंद झाल्यानंतरही आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या एप्रिल महिन्यात गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत मद्यविक्रीत ६६ टक्के वाढ झाल्याची माहिती आहे. मद्यविक्रीतून गेल्यावर्षी एप्रिलमध्ये २० कोटी ५३ लाख आणि यावर्षी एप्रिलमध्ये ३४ कोटी ७ लाख रुपयांचा महसूल मिळाला. तत्पूर्वी, आर्थिक वर्ष २०१५-१६ च्या एप्रिलमध्ये ३१ कोटी ७५ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. नागपूर विभागात किरकोळ मद्यविक्रीची १७६, मद्य दुकाने ६२, बीअर बार ५२१, क्लब परवाना ३, बीअर शॉपी ६६ अशी एकूण ८२८ मद्यविक्रीची दुकाने बंद झाली आहेत. त्यानंतरही एप्रिलमध्ये मद्यविक्रीत ६६ टक्के झालेली वाढ एक आश्चर्य आहे. तुलनात्मकरीत्या आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये प्राप्त महसुली आकडा पाहिल्यास नागपूर विभागाला २०१६-१७ मध्ये १९.४७ टक्के कमी अर्थात १२६ कोटी ८ लाख रुपयांचा महसूल कमी मिळाला. २०१५-१६ मध्ये विभागाचे ६७५ कोटींचे उद्दिष्ट असताना ६४७ कोटी ५९ लाख आणि ७७१.११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना २०१६-१७ मध्ये ५२१ कोटी ५१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत अभय कोलारकर यांना मिळाली आहे. कोलारकर यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची नागपूर विभागाने उत्तरे दिली नाहीत. वेगवेगळ्या मद्यांसाठी महाराष्ट्र सरकारने वयाची कोणती बंधने घातली आहेत आणि महाराष्ट्राच्या कायद्यानुसार मद्य खरेदी व प्राशन करण्यासाठी वेगवेगळे वय असताना किती लोकांवर कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिली नाहीत. पण एका प्रश्नाच्या उत्तरात शासनातर्फे नियमानुसार मद्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे उत्तर विभागाने दिले आहे.
मद्यविक्रीत ६६ टक्के वाढ
By admin | Published: June 08, 2017 2:50 AM