लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिटींग साहित्यात ६७ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह सहा जणांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. यामुळे मनपात खळबळ उडाली आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा, वित्त विभागातील अफाक अहमद, राजेश मेश्राम, एस. वाय. नागदेव व सामान्य प्रशासन विभागातील मोहन पडवंशी आदींचा समावेश आहे. या प्रकरणातील दोषी पुरवठादार कंपनीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे ॲन्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरूकृपा स्टेशनरी, एस.के.एन्टरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून रेट कॉन्ट्रॅक्टनुसार मनपाला स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. या कंपन्यांनी आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बील उचलण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे तक्रार केली. जोशी यांनी अधिक चौकशी केली असता २० डिसेंबर २०२० ते २१ मार्च २०२१ या कालावधीत विविध विभागांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांची बिले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या संदर्भात प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह सहा जणांना प्रशासनाने नोटीस बजावली. या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या स्टेशनरी बिलाचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले. पुरवठा न करता उचलण्यात आलेली ६७ लाखांची रक्कम संबंधित कंत्राटदारांनी जमा केल्याची माहिती राम जोशी यांनी दिली.
साहित्य पुरवठ्याचे दर आधीच निश्चित केले असल्याने विविध विभागामार्फत निविदा न काढता पुरवठादारांकडून साहित्य मागविले जाते. मनपाच्या कोणत्याही विभागात मंजुरीसाठी आलेली प्रत्येक फाईल ‘लेटर ॲन्ड फाईल मॅनेजमेंट’यंत्रणेच्या माध्यमातून पुढे जाते. परंतु उचलण्यात आलेल्या ६७ लाखांच्या फाईल या यंत्रणेतून मंजूर झालेल्या नव्हत्या. अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
दोषींवर कठोर कारवाई होणार
साहित्याचा पुरवठा न करता उचलण्यात आलेल्या ६७ लाखांच्या बिलासंदर्भात दोषी फर्म विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सहायक आयुक्त यांच्यासह सहा जणांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. पुरवठादारासह या प्रकरणातील अन्य दोषी आढल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
तीन लाखापर्यंच्या सर्व फाईल तपासणार
मागील तीन वर्षात तीन लाखापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या सर्व फाईलची तपासणी करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहे. अशा स्वरूपाच्या २४१ फाईलची तपासणी केली जाणार आहे. नियमानुसार बील काढण्यात आले की नाही याची सखोल चौकशी केली जाईल. यात अनियमिता आढळल्यास दोषीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.